छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्याचे आणखी अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, आता निम्मा मार्चही झाला नाही, तोच मराठवाड्यातील मोठी धरणे निम्म्याच्याही खाली गेली आहेत. ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघा ३२ टक्के पाणीसाठा राहिलेला आहे.
यामुळे मनुष्यासह पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे.
मराठवाड्याच्या ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३२ टक्के पाणीसाठा आहे. ५१५६ दशलक्ष घनमीटर प्रकल्पीय साठा असलेल्या या प्रकल्पांमध्ये सध्या ३३९८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. यापैकी अर्धा म्हणजे १६५४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठाच उपयुक्त आहे.
माजलगाव, सीना कोळेगाव या दोन प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे तर मांजरा आणि निम्न दुधना प्रकल्पात प्रत्येकी ११ टक्के पाणीसाठा आहे, हे प्रमाण चिंताजनक आहे. जायकवाडी धरणात २५ टक्के, येलदरीत ४१, सिद्धेश्वर ७५, ऊर्ध्व पैनगंगा ६०, निम्न मनारमध्ये ३५, विष्णुपुरीत ५४ टक्के तर निम्न तेरणा प्रकल्पात फक्त ६ टक्के पाणीसाठा आहे.
मागील आठवड्यात या मोठ्या धरणांमध्ये १६७४ दशलक्ष घनमीटर जलसाठा होता. त्यात आठवडाभरातच २० दशलक्ष घनमीटरची घट होऊन १६५४ दशलक्ष घनमीटर साठा झाला. मोठ्या प्रकल्पांपैकी पाचमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. दोनमध्ये २५ ते ५० टक्के तर ३ प्रकल्पांमध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा आहे. फक्त एका प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
आकडे बोलतात,७५० लघू प्रकल्पां पैकी९२ प्रकल्प कोरडे.,२६४ लघू प्रकल्पांमधील पाणी गेले जोत्या खाली.
२२३ लघू प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा.९९ लघू प्रकल्प ५० टक्क्यां च्या खाली गेले.
तीन मध्यम प्रकल्प पडले कोरडे.२५ मध्यम प्रकल्प जोत्याखाली